महाराष्ट्र

चितेजवळ मृतदेह तसाच सोडून नातेवाईक जीव मुठीत घेऊन पळाले; अंत्यविधीदरम्यान नेमकं काय घडलं? पुण्यातील Video व्हायरल

पुण्यातील आंबेगावमध्ये अंत्यसंस्कारादरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं आणि उपस्थितांना स्मशानभूमी का सोडावी लागली? जाणून घ्या.

Mayuri Gawade

पुणे : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमलेले नातेवाईक, शोकाकूल वातावरण आणि सुरू असलेले धार्मिक विधी... मात्र काही क्षणांतच संपूर्ण चित्र बदलले. अचानक झालेल्या एका अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थित ग्रामस्थांना मृतदेह काही काळ तिथेच ठेवून स्मशानभूमीबाहेर जावे लागले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा हल्ला

ही घटना आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरील वडगाव पीर येथील स्मशानभूमीत घडली. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यविधी सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील झाडावर असलेल्या मधमाशांच्या मोहोळाने अचानक उड्डाण केले.

क्षणार्धात मधमाशांनी उपस्थितांवर हल्ला चढवला. त्यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ उडाला.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्मशानभूमीत अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ घटनास्थळ सोडून दुसऱ्या दिशेने जाताना दिसतात. या गोंधळात अंत्यसंस्कारासाठी आणलेला मृतदेह काही काळ चितेजवळच पडून असल्याचेही व्हिडिओत दिसून येते.

अनेक जण जखमी

या घटनेत अनेकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नसून, उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

नंतर पुन्हा अंत्यसंस्कार पूर्ण

मधमाशांचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्रामस्थ पुन्हा स्मशानभूमीत परतले. त्यानंतर उर्वरित धार्मिक विधी पूर्ण करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषतः स्मशानभूमी परिसरात असलेल्या मधमाशांच्या मोहोळांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२