Kanpur Hit-And-Run : थारची स्कूटरला जोरदार धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला चालक फरार, Video

संतोष हे स्कूटरवरून पत्नीसाठी साडी घेऊन घरी परतत होते. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असताना भरधाव थारने...
Kanpur Hit-And-Run : थारची स्कूटरला  जोरदार धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला चालक फरार, Video
Kanpur Hit-And-Run : थारची स्कूटरला जोरदार धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला चालक फरार, Video Photo - X
Published on: 

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला भीषण अपघात घडला. शिकाऊ महिला चालक चालवत असलेल्या भरधाव थारने स्कूटरला मागून जोरदार धडक दिल्याने ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.७) संध्याकाळी ही घटना घडली. धडक इतकी भीषण होती की, स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर थारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या घराची संरक्षक भिंत तोडून थेट बागेत घुसली. अपघातानंतर थारमधील दोन महिला आणि एक पुरुष गाडीतून उतरून दुसऱ्या कारमधून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नीची साडी घेऊन घरी परतत असताना काळाचा घाला

या अपघातात संतोष सिंह चौहान यांचा मृत्यू झाला. ते पंकी येथील स्वराज नगर परिसरातील रहिवासी होते. शनिवारी संध्याकाळी साडेसात ते पावणेदहाच्या सुमारास कल्याणपूरमधील आवास विकास-३ परिसरात हा अपघात झाला. संतोष हे स्कूटरवरून पत्नीसाठी साडी घेऊन घरी परतत होते. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असताना भरधाव थारने त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर त्यांची स्कूटर जवळपास २० मीटरपर्यंत फरफटत गेल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर दुसऱ्या कारमधून पलायन

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, थारमध्ये दोन महिला आणि एक पुरुष प्रवास करत होते. त्यापैकी एक महिला गाडी चालवत असल्याचे सांगितले जात आहे. ती गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. अपघातानंतर थारचे मोठे नुकसान झाले. मात्र, गाडीतील तिघांनी घटनास्थळी थांबण्याऐवजी दुसऱ्या कारमधून पळ काढल्याचा आरोप आहे. काही वेळातच आलेल्या या कारमधून ते पसार झाले. अपघातानंतर थार घटनास्थळीच सोडून देण्यात आली.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतोष यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. थारचा क्रमांक UP78GX4475 असून, गाडीवर कृष्णा ग्रुपचे नाव असल्याचे समोर आले आहे. वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मालकाची माहिती मिळवली. या वाहनाचा नोंदणीकृत मालक कृष्ण कुमार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, संतोष यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवले जात आहेत. थार चालवणाऱ्या महिलेची ओळख, अपघातावेळी गाडीत नेमके कोण होते आणि अपघातानंतर पसार झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)