पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. या मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे.
अल्पवयीन आरोपीची आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. या याचिकेत अल्पवयीन आरोपीला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा आरोप त्याच्या आत्याने केला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता. त्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर न्यायालयाने याप्रकरणी मंगळवारी निकाल दिला. या निकालाने अल्पवयीन आरोपीला मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे कल्याणीनगर अपघात घटनेत दुचाकीवर असलेल्या ज्या तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता, त्या दोघांच्या आई-वडिलांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी संबंधित घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या आरोपी तरुणाची बालसुधारगृहातून सुटका होणार असून मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर
न्यायालयाने जामीन दिल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला पुन्हा ताब्यात घेणे बेकायदेशीर आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. २२ मे २०२४, ५ जून २०२४ आणि १२ जून २०२४ चे बालहक्क न्यायालयाचे जे आदेश आहेत, त्यामध्ये आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते, ते अवैध आहेत. त्यामुळे ते आदेश रद्द झाले आहेत. त्यामुळे अल्पवयीन आरोपीला तातडीने सोडावे आणि त्याचा ताबा आत्याकडे देण्यात यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ‘पोर्शे’ कार भरधाव वेगाने चालवत १९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवले होते. आरोपीने बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्याच्या मित्रांना पबमध्ये पार्टी दिली होती. तेथे त्याने मद्यप्राशन केले होते. त्याने नशेत महागडी पोर्शे कार भरधाव वेगात कल्याणीनगरच्या रस्त्यावर चालवून एका दुचाकीला धडक दिली.
आरोपी अल्पवयीन मुलगा हा पुण्यातील ख्यातनाम बिल्डर विशाल अग्रवालचा मुलगा असल्याची माहिती नंतर समोर आली. याप्रकरणी आरोपीला घटनेच्या अवघ्या काही तासांनी बालहक्क न्याय मंडळाकडून अल्पवयीन असल्याच्या मुद्द्यावरून जामीन मिळाला होता. केवळ ३०० शब्दांच्या निबंध लेखणाच्या शिक्षेच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. याप्रकरणी पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर पोलीस, सरकार यांच्यावरील दबाव वाढला होता. याप्रकरणी जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतशा अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत गेला. पण अखेर याप्रकरणी आता अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाला आहे.
पोलीस तपासात धक्कादायक गोष्टी उघड
या प्रकरणात या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला अटक करण्यात आली होती. विशाल अग्रवाल यांनी विविध कट रचत मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासात याप्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. ससून रुग्णालयातील डॉक्टरांचादेखील यात हात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.कार दुर्घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलगा, त्याचे आई-वडील, आजोबा यांनादेखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटक केली आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या ३ कारही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया
“कायद्यात काय तरतूद आहे, याची मला कल्पना नाही. न्यायालयाने काहीतरी विचार करूनच निर्णय दिला असेल. फक्त आम्हाला न्याय मिळायला हवा. त्या शहरात अश्विनीसारख्या हजारो मुली शिक्षण घेतात आणि नोकरी करतात. त्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया अपघातात मृत पावलेली अश्विनी कोस्टा हिची आई ममता कोस्टा यांनी दिली.