पुणे : पुणे विभागीय विधानपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे चव्हाट्यावर आले असून शिक्षक आणि पदवीधर दोन्ही मतदारसंघांत मित्रपक्षांनी थेट बंडखोरी केल्याने मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे.
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना, शिवसेनेचे (शिंदे गट) मंगेश चिवटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय भैय्या माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील घटकांनी भाजपला थेट खिंडीत गाठल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीत भाजपकडे गेली असून, टीडीएफ संघटनेची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या कौस्तुभ गावडे यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. मात्र, या निर्णयाला न जुमानता शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या थेट आदेशानुसारच आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले आहे.
महायुतीच्या दोन्ही प्रमुख घटक पक्षांनी (शिवसेना व राष्ट्रवादी) स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे मतविभाजनाचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीत ऐक्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्ष निवडणुकीत मित्रपक्षच आमनेसामने आल्याने पुण्यात विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या युतीला तडा गेला असून आगामी काळात हा राजकीय संघर्ष काय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पदवीधरमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली
शिक्षक मतदारसंघातील या धक्क्यानंतर पदवीधर मतदारसंघातही महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता जाधव रिंगणात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) नेते हसन मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भैय्या माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.आता दोन्ही मित्रपक्षांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात स्वतंत्र उमेदवार उतरवल्यामुळे महायुतीतील नाराजी आणि मतभेद केवळ व्यासपीठापुरती मर्यादित नसून थेट निवडणुकीच्या रिंगणात पोहोचल्याचे सिद्ध झाले आहे.