पुणे : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या मान-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका-३ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता उद्घाटन सोहळा होईल. या मार्गावरील प्रवासी सेवा त्याच दिवशी सकाळी ६ वाजल्यापासूनसुरू होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाची माहिती दिली. ही २३.२०३ किलोमीटर लांबीची पूर्णपणे उन्नत मेट्रो मार्गिका असून, ती 'पुणेरी मेट्रो' आणि 'पिंक लाइन' म्हणून ओळखली जाते.
मान येथून सुरू होणारी ही मार्गिका हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमार्गे शिवाजीनगरला जोडली जाणार आहे. जमीन संपादन आणि विविध सेवांचे स्थलांतर यांसह या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८,३१३ कोटी रुपये आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीमार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत ७.६० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमता उभारण्यात आली आहे. त्यापैकी ६.१० मेगावॅट क्षमता मेट्रो स्थानकांवर, तर १.५० मेगावॅट क्षमता कार डेपोमध्ये आहे. या हरित ऊर्जेतून प्रकल्पाच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे ३० टक्के गरज भागविण्यात येणार आहे. या मार्गावरील मेट्रो गाड्या सुमारे १०० महिला ट्रेन पायलट चालवणार आहेत. तसेच स्थानक नियंत्रक, तिकीट कर्मचारी आणि सहाय्यकांसह स्थानकांवरील एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ५० टक्के कर्मचारी महिला असतील.
पहिल्या टप्प्यात १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली
या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, त्यापैकी १७ स्थानके ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. यातील सात स्थानकांवर सुरुवातीला एकच जिना कार्यान्वित असेल तर दहा स्थानकांवर दोन्ही जिने उपलब्ध असतील. उर्वरित सहा स्थानकांपैकी दोन स्थानकांचे काम नोव्हेंबरअखेर, तर अन्य चार स्थानकांचे काम जानेवारी २०२७ पर्यंत टप्याटप्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. बस, रिक्षा आणि टॅक्सीसाठी सुविधामेट्रो स्थानकांवरून पुढील प्रवास सुलभ करण्यासाठी पीएमपीएमएल बस, रिक्षा, ओला-उबरसारख्या अपआधारित टॅक्सी आणि ई-बाइकसाठी स्वतंत्र पिकअप व ड्रॉप सुविधा उभारण्यात येत आहेत. हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
महिला ट्रेन पायलट चालवणार मेट्रो
संपूर्ण मार्गिकेची तपासणी रिसर्च डिझाइन्स अँड स्टैंडर्ड्स ऑर्गनायझेशनने केली आहे. पहिल्या १२.६० किलोमीटरच्या टप्प्याला २३ जुलै २०२६ रोजी, तर उर्वरित पाच स्थानकांच्या विभागाला २३ सप्टेंबर २०२६ रोजी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाली आहे. स्थानकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ३५० जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी आधुनिक माहिती व तिकीट प्रणाली आणि महा मेट्रोच्या विद्यमान मार्गिकांसह नव्या मार्गिकेवर वापरता येणारे संयुक्त मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे.