पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात संशयित विषारी दारू सेवनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तर पुण्यातील हडपसर परिसरात झालेल्या तीन मृत्यूंचाही विषारी दारूशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, फुगेवाडी परिसरात गेल्या २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यूंचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी विषारी दारू सेवनाचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुगेवाडी परिसरात झालेल्या मृत्यूंनंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला. याचदरम्यान पुण्यातील हडपसर भागातही तीन जणांचा मृत्यू झाला असून त्या प्रकरणाचाही तपास सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडातून फेस येणे आणि हृदयाचे ठोके मंदावणे अशी समान लक्षणे दिसून आली आहेत.
मिथेनॉल मिश्रित दारूचा संशय
तपास यंत्रणांना देशी दारूमध्ये मिथेनॉलसारखे विषारी रसायन मिसळल्याचा संशय आहे. मिथेनॉल हे अत्यंत घातक औद्योगिक रसायन असून त्याचे सेवन केल्यास अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यू होऊ शकतो.
मात्र, मृत्यूंचे नेमके कारण पोस्टमॉर्टेम आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुख्य संशयितासह ८ जण ताब्यात
पीटीआयच्या वृत्तानुसार, फुगेवाडी परिसरात झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अतुल कानडे यांनी सांगितले की, योगेश वानखेडे नावाच्या व्यक्तीने फुगेवाडी आणि हडपसर या दोन्ही भागांत दारूचा पुरवठा केल्याचा संशय आहे. त्याला पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांची गंभीर दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
"या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, विषारी दारूमध्ये मिथेनॉलसारखा पदार्थ मिसळण्यात आल्याचा संशय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनेक यंत्रणांकडून संयुक्त तपास
या प्रकरणाचा तपास पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून संयुक्तपणे केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, पोस्टमॉर्टेम आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त होईपर्यंत मृत्यूंचे कारण निश्चित मानू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.