Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Pune : दोन महिला पोलिस करणार होत्या समलैंगिक विवाह; आळंदीत लग्नाची तयारी, पत्रिकाही छापल्या, पण आता विवाह रद्द

आळंदीत वैदिक पद्धतीने समलैंगिक विवाहाची तयारी, पत्रिका छापूनही दोन्ही महिला पोलिसांचा निर्णय बदलला

Mayuri Gawade

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी, ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले होते. यासाठी दोघींनी पोलिस प्रशासनाकडे रजेचा अर्ज दिला असून, त्यासोबत लग्नपत्रिकाही जोडली होती. मात्र, आता हा नियोजित विवाह वैयक्तिक कारणास्तव रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस भरतीपासून झाली ओळख

दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली. प्रशिक्षणानंतर काही काळ त्या मुख्यालयात होत्या. त्यानंतर दोघींची एकाच पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

कुटुंबीयांचा होता विरोध

दोघींपैकी एका महिला पोलिसाच्या कुटुंबियांना त्यांच्या नात्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विवाहाला विरोध केला. कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा दोन सज्ञान व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलिस प्रशासनाने विवाह रोखण्याऐवजी गरच असल्यास समुपदेशनाची मदत देण्याची भुमिका घेतली.

एकीवर लिंगबदलाशी संबंधित उपचार

दोघींपैकी एका महिला पोलिसावर लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती आहे. यासाठी ती मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र, या उपचारांचा विवाह रद्द होण्याशी काही संबंध आहे का, हे स्पष्ट झालेले नाही.

समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता आहे का?

भारतात सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीचे समलैंगिक संबंध गुन्हा नाहीत. मात्र, समलैंगिक विवाहाला सध्या वैधानिक मान्यता नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. याबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे धार्मिक पद्धतीने विवाह सोहळा झाला तरी त्याला आपोआप कायदेशीर विवाहाचा दर्जा मिळत नाही.

विवाह रद्द होण्याचे कारण काय?

काही माध्यमांच्या वृत्तानुसार दोन्ही महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कारणास्तव विवाह रद्द केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. कुटुंबीयांचा किंवा सामाजिक दबाव होता का, यालाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द