Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा

शर्मिलाला झाडे लावण्याची आवड असल्याने फ्लॅटच्या बाल्कनीत छोटा बगीचा तयार करण्यासाठी एक चौकोनी कट्टा बांधण्यात आला होता. याच कट्ट्याचा वापर पतीला लपवण्यासाठी करायचा, असे तिने ठरवले...
Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा
Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासाX
Published on

बारामती : पतीला गुंगीचे औषध देऊन क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली, तो मरण पावल्याचे समजून घराच्या बाल्कनीतील कट्ट्यात टाकले आणि वरून माती भरून टाइल्स लावण्याची तयारीही केली... बारामतीतील या ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. पतीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ३८ वर्षीय शर्मिला प्रवीण जगताप हिने पोलीस चौकशीत पतीकडून वारंवार मारहाण आणि त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. “मला बाहेर नोकरी करू दिली जात नव्हती. माझी अवस्था मोलकरणीसारखी झाली होती. मुलांनाही मारहाण केली जात होती,” असे तिने चौकशीत सांगितल्याची माहिती आहे.

पती प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शर्मिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामती शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘मी बी. फार्मसी केली, पण नोकरीही करू दिली नाही’

अटकेनंतर झालेल्या चौकशीत शर्मिलाने पतीसोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक आरोप केले आहेत. "आपण बी. फार्मसीपर्यंत शिक्षण घेतले असूनही पती बाहेर नोकरी करू देत नव्हता, तो मला सतत मारहाण करायचा. घरात माझी अवस्था मोलकरणीसारखी करून ठेवली होती. मुलांनाही तो मारहाण करत होता. या सगळ्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खचले होते," असे शर्मिलाने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

बारामती शहरातील जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये प्रवीण जगताप आणि त्यांची पत्नी शर्मिला राहत होते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ३० जुलै २०२६ च्या रात्रीपासून १ ऑगस्टच्या सकाळपर्यंत या घरात धक्कादायक घटनाक्रम घडला.

शर्मिलाने प्रवीण यांना गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली. मारहाणीनंतर पुढे जे घडले, त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच हादरवणारे बनले.

बाल्कनीतील कट्टा बनला ‘कबर’?

शर्मिलाला झाडे लावण्याची आवड असल्याने फ्लॅटच्या बाल्कनीत छोटा बगीचा तयार करण्यासाठी एक चौकोनी कट्टा बांधण्यात आला होता. याच कट्ट्याचा वापर पतीला लपवण्यासाठी करायचा, असे तिने ठरवले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीणला त्या चौकोनी कट्ट्यात ठेवले. त्यानंतर त्याच्यावर माती टाकली. एवढ्यावरच न थांबता कट्टा कायमचा बंद करण्याच्या उद्देशाने त्यावर फरशी अथवा टाइल्स बसवण्याची तयारी देखील आरोपी पत्नीने केली.

Baramati : "बी. फार्मसीचं शिक्षण घेतलंय, पण नोकरी करू देत नव्हता"; पतीला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीचा खुलासा
Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

मजुराला आला संशय अन् प्रकरण उघडकीस

कट्ट्यावर टाइल्स लावण्यासाठी शर्मिलाने मजुराला बोलावले होते. मात्र, त्या ठिकाणची परिस्थिती आणि सुरू असलेल्या कामाबाबत मजुराला संशय आला. त्यानंतर या प्रकाराची माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बारामती शहर पोलिसांनी तातडीने संबंधित फ्लॅटमध्ये धाव घेतली. कट्टा उघडल्यानंतर त्यामध्ये प्रवीण जगताप बेशुद्ध अवस्थेत जिवंत आढळले, अशी माहिती आहे. त्यांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in