

पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह करून सुरू केलेल्या संसाराचा मालाडमध्ये रविवारी धक्कादायक शेवट झाला. पती-पत्नीमधील वाद इतका टोकाला गेला की, २९ वर्षीय महिलेचा जीव गेला. कौटुंबिक वादादरम्यान पतीने तिच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धक्कादायक म्हणजे, पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पती आपल्या चार वर्षांच्या मुलाला सोडून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुचिता साळुंखे असून आरोपी पतीचे नाव आकाश साळुंखे आहे. सुचिता एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होती. तर आकाश बेरोजगार असून त्याला दारू आणि अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मध्यरात्री पती-पत्नीमध्ये वाद
ही घटना रविवारी (दि.९) पहाटे मालाड पूर्वेकडील कुरार गाव परिसरातील शिवसागर सोसायटीमध्ये घडली. रात्री सुमारे १.४५ ते २.१५ वाजण्याच्या दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादादरम्यान आकाशने सुचिताच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
सुचिता आणि आकाश यांचा सुमारे पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश काम करत नसल्याने घरखर्चासाठी तो सुचिताकडे पैशांची मागणी करत असे. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत असल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयात नेले अन् त्यानंतर फरार
चाकूने वार केल्यानंतर आकाशनेच सुचिताला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर आकाशने रुग्णालयातून पळ काढला. चार वर्षांच्या मुलाला मात्र त्याने मागेच सोडले.
या प्रकरणी कुरार पोलिसांनी आकाश साळुंखेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.