Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल (Photo-X)
महाराष्ट्र

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

व्हिडीओमध्ये एक महिला बाळाला कडेवर घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याचवेळी...

किशोरी घायवट-उबाळे

पुणे : पिंपरी चिंचवडमधील जुनी सांगवी येथे बाळाला कडेवर घेऊन जाणाऱ्या महिलेवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. २६) सकाळी घडली. कुत्र्याने महिलेच्या पायाला चावा घेतल्याने घाबरलेल्या महिलेचा तोल गेला आणि तिच्या हातातील बाळ खाली पडून जखमी झाले. सकाळी सुमारे ११ वाजता मधुबन हाऊसिंग सोसायटीजवळ ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कारमागून अचानक आले कुत्रे

व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याचवेळी पार्क केलेल्या कारच्या मागून अचानक एक कुत्रा बाहेर येतो आणि महिलेवर झडप घालत तिच्या पायाला चावा घेतो. त्यानंतर दुसराही कुत्रा कारमागून बाहेर येऊन या कुत्र्यासह तेथून पळून जाताना दिसतो.

कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे महिला घाबरते. भीती आणि वेदनेमुळे तिचा तोल जातो आणि हातातील बाळ जमिनीवर पडते. त्यामुळे बाळाला दुखापत होते.

नागरिकांनी धाव घेत बाळाला सावरले

हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक तातडीने घटनास्थळी धावून येतात. व्हिडीओमध्ये नागरिक बाळाला शांत करताना तसेच महिलेची विचारपूस करताना दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रहिवाशांचा महापालिकेवर आरोप

भटक्या कुत्र्यांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, तक्रारी करूनही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

चिखली, जुनी सांगवी, वाकड, भोसरी आणि चिंचवडे नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचे आक्रमक कळप नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. विशेषतः लहान मुले, बाळांना घेऊन जाणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कुत्रा चावण्याच्या घटनांत वाढ

महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात कुत्रा चावण्याच्या नोंदवलेल्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये सुमारे १३ हजार ८०० घटना नोंदल्या गेल्या होत्या. ही संख्या २०२५-२६ मध्ये ३८ हजारांहून अधिक झाली आहे.

पाच वर्षांच्या मुलीवरही झाला होता हल्ला

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या गंभीर घटनांमुळेही नागरिकांमध्ये संताप आहे. अलीकडेच चिखली येथे सात भटक्या कुत्र्यांच्या कळपाने पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर उपचार करताना ८० पेक्षा अधिक टाके घालावे लागले होते.

निर्बीजीकरण आणि लसीकरणावर प्रश्नचिन्ह

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही महापालिकेच्या प्राणी जन्मनियंत्रण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमातील त्रुटींशी संबंधित असल्याचे रहिवासी आणि प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

निर्बीजीकरण केंद्रांची मर्यादित क्षमता तसेच कुत्र्यांना तात्पुरते ठेवण्यासाठी उपलब्ध पिंजऱ्यांची कमतरता यामुळे मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे कठीण होत असल्याचेही सांगितले जात आहे. जुनी सांगवीतील या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन ठोस पावले कधी उचलणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करा; सदा सरवणकर यांच्या कन्येची आयुक्तांकडे धाव

लोकायुक्त अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील शुक्रे