पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन; ‘अपघाती कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा’च्या घोषणा  
महाराष्ट्र

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन; ‘अपघाती कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा’च्या घोषणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील कथित प्रशासकीय अनागोंदी आणि खालावलेल्या शैक्षणिक दर्जाच्या निषेधार्थ आज विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली.

Swapnil S

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील कथित प्रशासकीय अनागोंदी आणि खालावलेल्या शैक्षणिक दर्जाच्या निषेधार्थ आज विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. ‘अपघाती कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलक विद्यार्थ्यांनी आरोप केला की, विद्यापीठाचा कारभार सध्या अकार्यक्षम पद्धतीने सुरू असून प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या या विद्यापीठाच्या शैक्षणिक क्रमवारीत मोठी घसरण झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान’ अंतर्गत मिळालेला सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी अद्याप अखर्चित असून, ही प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची मोठी साक्ष आहे. हा निधी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी न वापरल्याने अनेक प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच, परीक्षा संचालक आणि अधिष्ठाता यांसारखी महत्त्वाची प्रशासकीय पदे सध्या प्रभारी किंवा अतिरिक्त कार्यभारावर चालवली जात असल्याने निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. प्राध्यापक भरती समिती, करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्कीम तसेच संशोधनाशी संबंधित समित्यांचे गठन दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचाही आरोप करण्यात आला.

जोपर्यंत प्रशासन या गंभीर प्रश्नांची दखल घेत नाही आणि कुलगुरूंच्या राजीनाम्यासह इतर मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यापीठाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
शिव बरौले, विद्यार्थी प्रतिनिधी

९० दिवसांपासून निकाल रखडले

सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल गेल्या ९० दिवसांपासून रखडले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय कुलसचिवांच्या नियुक्तीशी संबंधित गोपनीय अहवाल फुटल्याचा गंभीर आरोप करत संबंधित दोषींवर कडक कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी ‘कमवा व शिका’ योजनेच्या मानधनात महागाईनुसार वाढ करणे, प्लेसमेंट सेल अधिक सक्षम करणे, तसेच पीएचडीशी संबंधित प्रलंबित समित्या तात्काळ स्थापन करणे अशा विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल