Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी (X व्हिडीओ स्क्रीनशॉट्स)
महाराष्ट्र

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील थत्ते महाराज भोषीकर दिंडीचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटला. त्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

पुणे : आषाढी वारीदरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात सोमवारी (दि.१३) सकाळी भीषण अपघात झाला. दिंडीचे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांच्या समूहाला धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे वारीत शोककळा पसरली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर दुर्घटना

बेलसर टोल नाक्याजवळील हॉटेल साईदीप परिसरात हा अपघात घडला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत जेजुरीच्या दिशेने पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. ट्रक चालकाची ओळख नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथील बालाजी एकनाथ डाक (६३) अशी झाली आहे.

दिंडीचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकचा ताबा सुटला

प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील थत्ते महाराज भोषीकर दिंडीचे सामान वाहून नेणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटला. त्यानंतर ट्रकने पालखीच्या पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांना धडक दिली.

तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

या अपघातात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवळापूर येथील नंदा पवार (७०), मालगाव येथील माधवी राजाराम सालगरे (५५) आणि कसबेडिग्रज येथील राजश्री शंकर भोसले (५५) यांचा मृत्यू झाला.

याशिवाय चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चालकाने तापावरील औषध घेतल्याचा संशय

अपघातग्रस्त वाहन हे थत्ते महाराज भोषीकर दिंडीचे टाटा कंपनीचे ट्रक (एमएच-४३ ई-४९०८) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात चालकाने वाहन चालवण्यापूर्वी तापावरील औषध घेतल्याचे समोर आले आहे. औषधामुळे झोप आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

चालक ताब्यात, तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

वारीत शोककळा

आषाढी एकादशीनिमित्त हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करत असताना हा भीषण अपघात झाला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सहकारी वारकरी, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याने वारीत शोककळा पसरली असून, भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ

अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय वैती अपात्र; खोटी माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा ठपका

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; वीज व पालखी तळावरील सुविधांची जय्यत तयारी

माजी खा. विनायक राऊत कुटुंबीयांविरोधात गुन्हा; सुनेकडून प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर आरोप