पुणे शहरात पुरुषावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्याचे खाजगी फोटो-व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी ४२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हा प्रकार जवळपास एक वर्षभर सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भाऊ म्हणत ओढले जाळ्यात
गौरी प्रल्हाद वांजळे असे आरोपी महिलेचे नाव आहे. पीडित पुरुषाने केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार ४७ वर्षीय पुरुषाची आरोपी महिलेशी पहिली भेट ७ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळजापूर येथे कौटुंबिक भेटीदरम्यान झाली. बहिण-भावाचे नाते सांगत वांजळे यांनी तक्रारदाराशी मैत्री वाढवली. त्यानंतर ती वारंवार त्यांच्या घरी जाऊ लागली. घरातील सदस्यांशीही तिने विश्वासाचं नातं निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदाराच्या पत्नीला विश्वासात घेत आरोपीने ती आणि तिच्या मैत्रिणीचे कुटुंब काशी विश्वनाथला जात आहे, तुमच्या पतीला भावाच्या नात्याने सोबत पाठवा असे सांगितले. पीडित पुरुषाच्या पत्नीनेही या नात्यावर विश्वास ठेवून सहमती दिली.
बेशुद्ध अवस्थेत लैंगिक अत्याचार
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मैत्रिणीची सासू वारली आहे आपण दोघेच जाऊया असा बनाव केला. एका रात्रीसाठी स्वत:च्या घरी थांबवून घेतले. या दरम्यान त्याला मादक पदार्थ दिले. बेशुद्ध अवस्थेत त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर त्यादरम्यान आरोपी महिलेने त्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओही काढले. या सामग्रीचा वापर पुढे ब्लॅकमेलिंगसाठी केल्याचे म्हटले आहे.
२ लाख रुपयांची मागणी
तीने त्याला धमकावत बनारसमध्ये तीन दिवस तिच्यासोबत राहण्यास भाग पाडले. पुण्यात परतल्यानंतर वांजळेने २ लाख रुपयांची मागणी केली. त्याचसोबत तिने तक्रारदाराला लग्नाची ऑफरही दिली आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अश्लील फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेची पोलिसांत धाव
सततच्या धमक्यांना कंटाळून पीडित पुरुषाने अखेर कोथरूड पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध लैंगिक अत्याचार, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
कोथरूड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल झाला आहे. परंतु तपास पूर्ण होण्यापूर्वी काहीही सांगणे योग्य ठरणार नाही. सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
या प्रकरणामुळे पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीदेखील तितक्याच गांभीर्याने हाताळण्याची गरज अधोरेखित झाली आहे.