रायगड जिल्हा परिषदेचे भवितव्य गोव्यात ठरणार; भाजप-राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो व्हायरल 
महाराष्ट्र

रायगड जिल्हा परिषदेचे भवितव्य गोव्यात ठरणार; भाजप-राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या गोव्यातील एका छायाचित्रामुळे रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा फॉर्म्युला गोव्यात ठरत असल्याचे संकेत मिळत असून, या फोटोमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा एकत्रित फोटो समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांच्या चर्चांना अधिक वेग आला आहे.

अरविंद गुरव

पेण : सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या गोव्यातील एका छायाचित्रामुळे रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा फॉर्म्युला गोव्यात ठरत असल्याचे संकेत मिळत असून, या फोटोमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा एकत्रित फोटो समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांच्या चर्चांना अधिक वेग आला आहे.

या छायाचित्रात धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, रवीशेठ पाटील, सुनील तटकरे तसेच भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्यासह दोन्ही पक्षांचे नवनिर्वाचित सदस्य दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेमधील एकही सदस्य किंवा वरिष्ठ नेता या फोटोमध्ये दिसत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. या सर्व नेत्यांची एकत्रित उपस्थिती सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेत भाजपला १५, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागा मिळाल्या असून, दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या ३१ इतकी होते. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ही संख्या पुरेशी मानली जात असल्याने '३१ चा जादुई आकडा' सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काढलेल्या या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली आहे. विशेष म्हणजे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युतीतून पाच जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तेत शिवसेना (उद्धव गट) यांनाही वाटेकरी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी भाजप-राष्ट्रवादी सदस्यांना गोव्यात नेऊन ठेवले आहे, असा आरोप केला होता. संबंधित नेत्यांकडून या बैठकीबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी राजकीय पातळीवर हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.

शिंदे गटात अस्वस्थता?

दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासमीकरणे झपाट्याने बदलत असताना स्वतंत्र सदस्यांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा रंगत आहे. सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी 'गोवा कनेक्शन'ने रायगडच्या राजकारणात नवा द्विस्ट आणल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल