राज ठाकरे यांचा संग्रहित फोटो  
महाराष्ट्र

तुम्ही दुप्पट उत्तर दिले! राज ठाकरेंकडून मनसैनिकांचे कौतुक

‘तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिले आहे. त्यामुळे तुम्ही आता सगळे हे थांबवा’, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.

Swapnil S

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शनिवारी मनसैनिकांनी नारळ, शेण, बांगड्या फेकल्याच्या घटनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे समर्थनच केले. ‘तुम्ही जशास तसे नव्हे तर जशास दुप्पट उत्तर दिले आहे. त्यामुळे तुम्ही आता सगळे हे थांबवा’, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.

राज यांनी ‘एक्स’वर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर माझ्या मनसैनिकांनी जी निदर्शने केली, ती संतापातून आलेली प्रतिक्रिया होती. माझ्या नवनिर्माण यात्रेदरम्यान विघ्ने उभी करण्याचे प्रयत्न धाराशिवपासून सुरू झाले. धाराशिवमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली घोषणा देत होते. पण पुढे लक्षात आले की, त्यांचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता. ते तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटांशी संबंधित होते आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियातून उघड्या पडल्या. बीडमध्ये तर उघडपणे उबाठा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाने निदर्शनाच्या नावाखाली फार्स केला आणि त्यावर कुठेही निषेधाचा सूर लवकर न उमटल्यामुळे माझ्या मनसैनिकांनी जे केलं ते केलं. माझ्या नादाला लागू नका, कारण माझा मनसैनिक काय करेल, हे तुम्हाला कळणार नाही, हे मी पत्रकार परिषदेत सांगितले होते. ज्याची प्रचिती शनिवारीच आली.”

“मुळात आपण महाराष्ट्रात आहोत, हे भान एकूणच राजकीय व्यवस्थेचे कमी होऊ लागले आहे. राजकारण म्हणाले की, मुद्द्यांची लढाई आलीच. एकमेकांवर शाब्दिक तिखट वार हेदेखील होणार. पण म्हणून कोणीही उठून, कोणाहीबद्दल काहीही बोलावं आणि कुठल्याही थराला जाऊन दौऱ्यामध्ये विघ्न निर्माण करणे आणि टीआरपी मिळतोय किंवा काहीतरी बातम्यांचे गुऱ्हाळ चालवायला बातमी मिळत आहे, म्हणून अशा थोबाड उचकटणाऱ्यांना माध्यमांनी पण उचकवणे थांबवले पाहिजे. या सगळ्यातून महाराष्ट्रात तणाव वाढेल, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. माझ्या पक्षात तर आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत हे असले प्रकार, अगदी पक्ष स्थापनेपासून मनसैनिकांनी कधी केले नाहीत आणि चुकून त्यांनी केले तरी ते मी खपवून घेणार नाही, याची त्यांना पण जाणीव आहे,” असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तुमची शक्ती वाया घालवू नका!

माझ्या मनसैनिकांनी असल्या सुमार लोकांसाठी तुमची शक्ती वाया घालवू नका. महाराष्ट्राची राजकीय परिपक्वता, राजकीय मतभेद झाले तरी मनभेद होऊ द्यायचे नाहीत, ही संस्कृती किमान आपल्याकडून पुसली जाणार नाही, हे आपण पाहूया. पण हे करताना तुमच्या नावावर खपवून, परस्पर पक्षाला बदनाम करण्याचे प्रकार कुठे घडत नाहीत ना, याकडे पण लक्ष ठेवा. महाराष्ट्रात शांतता नांदेल, इथल्या निवडणुका शांततेत पार पडतील हे किमान आपण तरी नक्की पाहूया आणि तरीही नतद्रष्ट सुधारणार नसतील, तर त्यांचे काय करायचे ते नंतर पाहू, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

ठाण्यातील राड्याप्रकरणी ४४ जणांवर गुन्हे दाखल

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्याप्रकरणी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ४४ जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. या राड्यानंतर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे यांच्या गाड्यांवर नारळ, शेण फेकल्या प्रकरणात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून, त्यांच्यासह प्रीतम मोरे, आकाश पवार, अरुण जेटलू, मनोज चव्हाण यांच्यासह ४४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व गुन्हे जामीनपात्र आहेत.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती