महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी ; वाचा पत्रामध्ये काय म्हणाले ?

सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधाने करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरू आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे

प्रतिनिधी

भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर आरोपींवर काही गंभीर कलमे लावण्यात आली. पोलिसांवर झालेली कारवाई अनाठायी असल्याचे वाटल्याने व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्याची मागणी केल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. त्यामुळे पोलिसांवरील कारवाई टळली असून आरोपींवरील गंभीर कलमेही शिथिल करण्यात येणार आहेत.

राज ठाकरेंनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून विधाने करून माथी भडकवण्याचे उद्योग सुरू आहेत आणि त्या वादांमधून मतं मिळवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यामुळे एखादं विधान आलं की कोणतीही खातरजमा न करता कार्यकर्ते वाट्टेल त्या मार्गाने निषेध करतात. यामुळे कुणाच्या तरी जीवावर बेतू शकते, याचा ते विचार करीत नाहीत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत असाच प्रकार घडला. त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यामुळे त्यांच्या डोळ्यावर इजा होण्याची भीती होती. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी ११ पोलिसांना निलंबित केले तसेच आरोपींवर अनेक कलमांच्या जोडीला कलम ३०७ हे सदोष मनुष्यवधाचे कलमही लावण्यात आले. याबाबत पिंपरी-चिंचवड येथील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना भेटून पोलिसांनी दाखल केलेली कलमे गंभीर असल्याची तक्रार केली व याप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.

पोलिसांवर झालेल्या कारवाईने राज ठाकरे हे अस्वस्थ होते व ही कारवाई अनाठायी असल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी चंद्रकांत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना ही कारवाई शिथील करण्याची विनंती केली. त्यांनीही विनंतीचा मान ठेवून पोलिसांचे निलंबन मागे घेण्याची व ३०७ कलम शिथील करण्याची तयारी दर्शवली, असे राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

Maharashtra Assembly Elections 2024: नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ तारखेपर्यंत मुदत

१ ते १९ नोव्हेंबरदरम्यान एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची नवी धमकी

मुंबईत शिवसेना ठाकरे गट देणार 'हे' नवे चेहरे; मातोश्रीवर होणार अंतिम निर्णय