महाराष्ट्र

६ वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंना ६५ व्या वाढदिवशी भावाकडून मोठं सरप्राईज गिफ्ट

आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६५ वा वाढदिवस. हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास ठरला. कारण आज सकाळी त्यांचे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना सुखद धक्का दिला. राज ठाकरे आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले.

नेहा जाधव - तांबे

आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ६५ वा वाढदिवस. हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास ठरला. कारण आज सकाळी त्यांचे बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना सुखद धक्का दिला. राज ठाकरे आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीचे संकेत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

याआधी काही दिवसांपूर्वी मुंबईत हिंदी सक्तीच्या मुद्यावर झालेल्या मेळाव्यातही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आले होते. तेव्हाच युतीची शक्यता व्यक्त केली जात होती. आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने त्या चर्चांना नव्याने बळ मिळाले आहे.

राज ठाकरे यांची सरप्राईज भेट

सकाळी अचानक राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना फोन करून मातोश्रीवर येत असल्याचे कळवले. त्यानंतर काही मिनिटांतच राज ठाकरे मातोश्रीवर हजर झाले. उद्धव ठाकरे चक्क आपल्या भावाला आणण्यासाठी गेटवर आले.

या भेटीत एक विशेष क्षण घडला. राज आणि उद्धव यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर गळाभेट झाली. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर भावनिक आनंद झळकत होता. यावेळी राज यांनी लालबुंद गुलाबांचा मोठा गुच्छही भेट दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले...

उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना फक्त दोनच शब्दांत भावना व्यक्त केल्या "आज मला खूप आनंद झाला आहे." या भेटीवेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भेटीनंतर राज ठाकरे यांची पोस्ट चर्चेत

या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी भेट घेतल्याचेही सांगितले. त्यांनी पोस्ट केले, कि ''माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.'' या पोस्टमधील माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख या शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधले.

६ वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर

१८ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्री सोडली होती. त्यानंतर ५ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते. आज पुन्हा एकदा त्यांनी मातोश्रीवर पाऊल ठेवले आणि उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषही साजरा केला.

राज ठाकरे यांच्या आजच्या अचानक भेटीमुळे ठाकरे कुटुंबात नव्याने संवादाची सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांचा अबोला सुटून हे नव्या युतीचे संकेत आहेत का? हे पाहणे औत्स्युक्याचे ठरले आहे.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास