महाराष्ट्र

अजित पवारांकडे कृषीखाते द्यावे! राजू शेट्टी यांची थेट मागणी

अजित पवारांनी कृषी मंत्रीपद स्वीकारल्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट करत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी केली.

Swapnil S

पुणे: अजित पवारांनी कृषी मंत्रीपद स्वीकारल्यास आपली हरकत नसल्याचे स्पष्ट करत, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी केली. दरम्यान, माणिकराव कोकाटे जरी बेजबाबदार असले, तरी अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संपत नाही किंवा देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संपत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. हे राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि या राज्यातल्या शेतीकडे मुख्यमंत्र्याचे, उपमुख्यमंत्र्याचे लक्ष नसेल, तर मग कुणीही कृषीमंत्री झाला तर काय फरक पडणार आहे? असा सवालही त्यांनी केला.

राजू शेट्टी यांनी बुधवारी थकीत एफ. आर. पी. साखर कारखानदार व राज्य साखर संघाने घेतलेली एफ. आर. पी. बाबतची भूमिका यासंदर्भात साखर आयुक्तांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, अजित पवारांनी कृषी मंत्रीपद स्वतःकडे घेतले, तर माझी काही हरकत असायचे कारण नाही. पण पहिल्यांदा त्यांनी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. माणिकरावांनी जाता-जाता एक चांगले काम केलेले आहे. खरंतर कसे केले काही माहित नाही. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला त्यांनी ४० कोटी रुपये मंजूर केले. अजित पवारांना ते खुपत असावे. ती मंजुरी मात्र नामंजूर करू नये, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या जागी राज्याच्या कृषीमंत्रीपदी मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, मुळामध्ये कुणीही आला, तर जोपर्यंत प्रवृत्ती बदलत नाही, तोपर्यंत फरक पडणार नाही.

एकनाथ शिंदेंना शेतातले किती कळतंय ?

एकनाथ शिंदे कृषी मंत्री म्हणून तुम्हाला पाहायला आवडतील का? असे विचारले असता, शेतात जाऊन शूटिंग केले, फोटो काढला म्हणजे शेती कळली असे होत नाही. मग,अनेक मराठी कलाकार सुद्धा शेतकऱ्याचे रोल करतात, पण त्यांना शेतीतलं किती कळतंय मला माहित नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

अश्लील कंटेट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्राची बंदी

शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र