महाराष्ट्र

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून धरला. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Swapnil S

कोल्हापूर/सांगली : नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुमारे दीड तास रोखून धरला. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह ४०० जणांवर कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात शक्तिपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर अंकली येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यासह ५० जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचाही समावेश आहे.

दरम्यान, आंदोलनापूर्वी राजू शेट्टी यांच्या शिरोळ इथल्या घरी कोल्हापूर पोलीस पोहोचले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीससुद्धा बजावण्यात आली होती. अशातच बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई