मुंबई : राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सहा जागांवर कोणाची वर्णी लागेल, याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सहा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडून सुनील तटकरे किंवा पार्थ पवार यांना संधी मिळू शकते. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचे नाव चर्चेत आहे, तर भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर या नावांची जोरदार चर्चा आहे.
आगामी निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या भाजपकडून राज्यसभेवर असलेल्या प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील महाराष्ट्राचे सध्याचे वजनदार नेते आणि बिहारमध्ये काही दिवसांपूर्वीच सत्तापालट करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. पंकजा सध्या राज्याच्या राजकारणात कुठेही नसल्या तरी पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सध्या भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्या हक्काच्या परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे फारच कमी आहेत. त्यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा राजकारणात सक्रिय करण्यासाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. भाजपचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची मुदत येत्या दोन एप्रिलला संपणार आहे. या सहा जागांवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे.
राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडे १०४ आमदार असून अजित पवार गटाकडे ४२ आमदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४०, तर ठाकरे गटाकडे १६ आमदार आहेत. काँग्रेसकडे ४५, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ११ आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे ३, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि प्रहार जनशक्तीकडे प्रत्येकी २, तर मनसे, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे प्रत्येकी १ आमदार असून १३ अपक्ष आमदार आहेत.