क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

कल्याण येथून एका क्रिकेट ॲकॅडमीचे सुमारे २० ते २२ मुले आणि दोन शिक्षक कोळंबे येथे सुरू असलेल्या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आले होते.

Swapnil S

रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे येथे क्रिकेट खेळण्यासाठी कल्याणहून आलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुभम यादव आणि सौरभ झा अशी मृत मुलांची नावे असून, दोघेही १६ वर्षांखालील असल्याची माहिती मिळाली आहे.

कल्याण येथून एका क्रिकेट ॲकॅडमीचे सुमारे २० ते २२ मुले आणि दोन शिक्षक कोळंबे येथे सुरू असलेल्या १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आले होते. गुरूवारी दुपारी त्यांचा सामना संपल्यानंतर काही मुले मैदानालगत असलेल्या जंगलातील पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी गेली.

यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम यादव आणि सौरभ झा हे दोघे खोल पाण्यात बुडाले. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक जमा झाले, पण त्यांनी मुलांना बाहेर काढेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. डोहात उडी मारताना दगडावर आदळल्यामळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

डोहाजवळ पोहण्यासाठी जाऊ नये, याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी सूचना फलक लावले आहेत. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड असल्याने नागरिकही या परिसरात जाणे टाळतात. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करून मुले डोहात उतरल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटनस्थळी किंवा अनोळखी जलस्रोतांवर जाताना स्थानिकांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ; 'झेड प्लस' सुरक्षा अजून मजबूत

Mumbai : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल उद्यापासून सेवेत; ध्वनिरोधक बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात

Mumbai : भगत ताराचंदसह चौघांचे परवाने रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Mumbai : वरळीची हवा सर्वात खराब; एक्यूआय १६४ वर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी