'आपण सोशल मीडियावर कमी पडतोय'; रविंद्र चव्हाण यांच्याकडून नेते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या 
महाराष्ट्र

'आपण सोशल मीडियावर कमी पडतोय'; रविंद्र चव्हाण यांच्याकडून नेते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Nagpur Graduate Constituency Election: वर्ध्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रिय होण्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या.

Krantee V. Kale

नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे १२ लाख सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान ५० हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचे प्रमोशन करावे, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.

नागपुरात मंचावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजप आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, परिणय फुके आणि शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी असताना या कानपिचक्या त्यांनी दिल्या आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्यावेळी प्रथमच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याची आठवण करून देत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पूर्व विदर्भात दोन दिवसांत सहा बैठका घेतल्या.

नागपूरच्या एअरपोर्ट बँक्वेट हॉल येथील आपल्या दौऱ्याच्या अंतिम बैठकीत नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा येथील प्रमुख भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वात आधी, “आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे का? आपली तशी इच्छा आहे का?” असा सवाल टाकत उपस्थितांची विकेट घेतली.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्यापैकी किती जणांची सक्रिय उपस्थिती असते, असे पुढे सवाल करत त्यांनी सर्व उपस्थितांना अंतर्मुख केले आणि “आपण सोशल मीडियावर कमी पडतो”, असे सरळ स्पष्ट विधान करून कानपिचक्या दिल्या.

रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा मिळून सुमारे अंदाजे ७० लाख लोकसंख्या आहे. यापैकी सुशिक्षित पदवीधर अंदाजे १२ लाख असावेत, असा अंदाज आहे.

आपली राज्यात दीड लाखांपेक्षा जास्त सक्रिय सदस्य असलेली पार्टी आहे. इथल्या ८० टक्के लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचे सांगितले आहे.

पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्री यांनी घेतलेले निर्णय पाहून त्यासाठी डिझाइन बनवून तुमचे नाव, तुमचे पद यांचा उल्लेख करून आपल्या पेजवर टाकत राहिलो आणि शेअर करत राहिलो तर महाराष्ट्रात एक चांगले वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरू.

आपल्यापैकी सोशल मीडिया क्षेत्रात तज्ज्ञ कोण आहे. त्याचे ऐकाल का? हे जर केलं तर त्याचे परिणाम लवकर दिसेल. केंद्र आणि राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविणे, यावर भर दिला पाहिजे.

काही शक्ती अजेंडा घेऊन उतरतील. मग आपण काय करावं? तुमच्यापैकी नगरसेवक किती आहेत इथे? फक्त नगरसेवकच नाही, बाकी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदी मुख्य कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपण जेव्हा लोकांच्या भेटी घेतो, तेव्हा ते आपल्या समस्या सांगतात. त्या ऐकल्याच पाहिजे. पण त्याच वेळी आपण व्होकल झालो पाहिजे. आपली भाजप कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख. आपण ठरवायचे की अशावेळी त्यांना काय सांगावे?

आपण राजकारणात कशासाठी आहोत. सत्तेसाठी नव्हे तर राष्ट्राचे हित साधण्यासाठी आहोत. गेल्या काही काळात आपण प्रत्येक निवडणुका जिंकत आहोत.

आपला जाहीरनामा, अजेंडा हा अटलजींपासून मोदीजींपर्यंत राष्ट्रहिताचाच तोच अजेंडा आहे. वेगळे काही नाही. राष्ट्राचे हित आणि विकास हाच अजेंडा.

पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्याने देशाचे काय भले झाले ते आपल्याला सर्वांना माहित असून आपण बोलत नाही. ते आपण सांगितले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्याच दिवशी कॅबिनेट निर्णय झाला की घुसखोरी जिथून होते ती जागा केंद्राला देण्याचा निर्णय झाला. मोदींनी देशाच्या पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेतले आहेत.

आपण जर तिरंगा रॅली करत आहोत तर कशासाठी ते सांगितले पाहिजे. रशियाच्या अंतराळवीरांनी भारताचा तिरंगा दाखवून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. का दिल्या, भारत त्या स्थितीत पोहोचला आहे.

२०४७ चा विकसित भारत बनविण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा काय रोल ते सांगणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात आधी दुष्काळ कसा होता. आपण काय करू शकलो. कागदावर असलेल्या योजना प्रत्यक्षात आणल्या. याला केंद्राचे असलेले योगदान काय. पुढच्या पिढीला दिशा देणाऱ्या या सर्व योजना आहेत.

१४ तास लोडशेडिंग होते. आज वन नेशन वन ग्रिड योजना राबवली गेली. विजेचा पुरवठा, विजेचे दर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न केले.

उद्योग क्षेत्रात काय होत आहेत. जीएसटीवर बोललो पाहिजे. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत चांगले सांगण्यास सुरुवात करा.

ज्या राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने आपण सारे जोडले गेले आहोत, ज्या राष्ट्रीयत्वासाठी आपण राजकारणात आलो, ते आपले मूळ सामान्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात सांगायला सुरुवात करा.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

इंडोनेशिया पुन्हा हादरले! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा हाय अलर्ट; VIDEO

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय