मुंबई : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. १२५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि १,१०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या विजयोत्सवावेळी ते बोलत होते. ढोलताशांचा गजर करत ,गुलाल उधळत, मिठाई वाटप करीत भाजपाचा विजय साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते आ. श्रीकांत भारतीय, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सचिव भरत राऊत, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. भाजपा कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून या निवडणुकीत मेहनत घेतली असून हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असेही चव्हाण यांनी नमूद केले.
आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कामकाजावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय सत्यात उतरला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबिन, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अरुण सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने लढली. या विजयाचे सर्व श्रेय हे मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि अर्थातच मतदारांचे आहे. या विजयाचा सन्मान राखत राज्यातील जनतेने भाजपा महायुतीकडून ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस हे एकमेव नेतृत्व राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. मराठवाडा ग्रीड मुळे अनेक ठिकाणी पाणी पोचले, विदर्भाचा अनुशेष भरून काढला जात आहे, कोकणाचा समृद्ध विकास होत आहे. अशा रितीने प्रत्येक विभागाचा विकास केला म्हणून जनतेने भाजपा महायुतीला कौल दिला असेही चव्हाण यांनी नमूद केले.
नगरपालिकांच्या निकालाने राज्यात महायुतीच नंबर वन असल्याचे स्प्ष्ट झाले असून मी मी म्हणवणारे वाचाळवीर या निकालाने तोंडावर पडले. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो. त्यांनी मराठी माणसासाठी काय केले? काँग्रेसच्या नादी लागून काही जण बोलतात. आजच्या निकालाबददल आम्हाला आनंद होत असताना भुसावळची जागाही मिळू न शकल्याबददल मला दु:ख आहे.गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचंड मेहनत
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मेहनत घेतली. राज्यात ५० हून अधिक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. ज्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते तेथे दूरध्वनीवरून, ऑनलाइन पद्धतीने मतदारांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि राज्याचा केलेला विकास यामुळे हा विजय प्राप्त झाल्याचे चव्हाण म्हणाले.