गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासावर अनेक चित्रपट आले. यामध्ये काही हिंदी तर अनेक मराठी चित्रपटांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला. यानंतर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी निर्माते तसेच दिग्दर्शकांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही. शिवरायांचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणू नये. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करू नका. कलाकार मंडळींनी हे गांभीर्याने घ्या. असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे,"
पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संभाजी राजे यांनी म्हंटले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर आणले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. इतिहासावर आधारित चित्रपट काढले जातात, ही चांगली गोष्ट आहे. पण, लोकांना आवडतात म्हणून विपर्यास करून असले चित्रपट काढू नका."