महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाने प्रवास करताय? १० दिवस वाहतूक निर्बंध; कोणता रस्ता कधी बंद? जाणून घ्या सविस्तर

महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत वाहतूक सिग्नल, कॅमेरे, किंवा टोल यंत्रणेसाठी रस्त्यावर लोखंडी चौकट अर्थात गॅन्ट्री (Gantry) बसवण्याचे काम सुरु केले जाणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर पुढील काही दिवस वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत वाहतूक सिग्नल, कॅमेरे, किंवा टोल यंत्रणेसाठी रस्त्यावर लोखंडी चौकट अर्थात गॅन्ट्री (Gantry) बसवण्याचे काम सुरु केले जाणार आहे. या कामासाठी ९ ते १८ फेब्रुवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक थांबवली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिली आहे.

बुलढाणा-जालना भागात एक तास वाहतूक बंद

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नुसार, बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर हे काम एकूण ९ टप्प्यांत करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात मुंबईकडे आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक सुमारे एका तासासाठी थांबवली जाईल.

कोणत्या ठिकाणांवर बसवणार गॅन्ट्री?

नागपूरकडून सुमारे ३०० ते ३६५ किलोमीटर दरम्यान गॅन्ट्री उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा (बुलढाणा), जालना तालुका या ठिकाणांचा समावेश आहे. येथील काम पूर्ण होताच संबंधित दिशेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल.

कोणत्या वेळेत वाहतूक बंद?

माहितीनुसार, ९ ते १८ फेब्रुवारीदरम्यान, काही दिवस मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत बंद राहील. तर काही दिवस नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत थांबवली जाईल. काही टप्प्यांमध्ये दोन्ही बाजूंनी वाहतूक तात्पुरती बंद ठेवली जाऊ शकते.

वाहनचालकांसाठी सूचना

एमएसआरडीसी (MSRDC) ने वाहनचालकांना पुढील सूचना दिल्या आहेत-

  • प्रवासाचा प्लॅन आधीच करा

  • ब्लॉकच्या वेळेत संबंधित भागात जाणे टाळा

  • उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊनच प्रवास करा

विशेषतः बुलढाणा आणि जालना परिसरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी या वाहतूक बंदची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai : बेलासिस पुलाचे सुरक्षा प्रमाणपत्र जारी; पश्चिम रेल्वेची माहिती

Mumbai : रहिवाशाने OTP दिला; पैसे गमावल्याबद्दल बँकेला दोष नाही! ग्राहक आयोगाचा निर्णय

Thane : पाणी बिल थकबाकीसाठी पालिकेची मोहीम तीव्र; १५ दिवसांत ९.८८ कोटींची वसुली

Mumbai : सख्खे वैरी शेजारी शेजारी! ठाकरे सेनेच्या कार्यालयातच शिंदेसेनेचे कार्यालय; दरवाजा पश्चिमेला

बनावट प्रमाणपत्राला चाप; बोगस आदिवासी विद्यार्थी शोधमोहीम, आदिवासी विकास विभागाचा निर्णय; २०२४-२५ वर्षातील प्रवेश तपासणा