सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक : अभयसिंह जगताप विरुद्ध धैर्यशील कदम खरी लढत  
महाराष्ट्र

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक : अभयसिंह जगताप विरुद्ध धैर्यशील कदम खरी लढत

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांनी माघार न घेतल्याने रिंगणात तीन उमेदवार कायम आहेत. मात्र, प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि भाजपचे धैर्यशील कदम यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप/कराड

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने अनपेक्षित वळण घेतले असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी घडलेल्या घडामोडींमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांनी माघार न घेतल्याने निवडणूक रिंगणात तीन उमेदवार कायम असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप आणि भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी झालेल्या छाननीत दाखल आठ अर्जांपैकी सात उमेदवारांचे एकूण अकरा अर्ज वैध ठरले होते. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अपेक्षेप्रमाणे बहुतांश अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. मात्र, किशोर धुमाळ यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने रिंगणात तीन उमेदवार उरले आहेत. तरीही निवडणुकीतील मुख्य आणि चुरशीची लढत अभयसिंह जगताप आणि धैर्यशील कदम यांच्यातच होणार आहे.

महाविकास आघाडीने यापूर्वी प्रताप ऊर्फ बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्याआधीच अभयसिंह जगताप यांचा अर्ज सूचक सागर पोळ यांनी आवश्यक अधिकृत कागदपत्रांसह दाखल केला होता. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी जगताप यांचा अर्ज अधिकृत मानला, तर बाळासाहेब पाटील यांचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरला. या नाट्यमय घडामोडीनंतर अभयसिंह जगताप हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले.

यानंतर जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. त्यानंतर ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवून विजय मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीचे गणित आणखी गुंतागुंतीचे होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनेक तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये तानाजी भगवान पाटील, प्रताप धोंडीराम पाटील, मयूर बाबासो पाटील आणि संजय नायकू मेंढे यांचा समावेश आहे.

निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार

या मतदारसंघात एकूण ८९५ मतदार असून त्यापैकी सातारा जिल्ह्यात ४७२ तर सांगली जिल्ह्यात ४२३ मतदार आहेत. सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपकडे ३४५, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २११, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे ११९, शिवसेनेकडे १११, काँग्रेसकडे ७५ आणि अपक्षांकडे ३१ मतदार आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाकडे प्रत्येकी एक मतदार आहे. मात्र, या निवडणुकीत पक्षादेश लागू होत नसल्याने क्रॉस व्होटिंग आणि राजकीय समीकरणांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय आणि वैयक्तिक संबंध कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात वजन टाकतात, यावरच विजय-पराजयाचे अंतिम गणित अवलंबून राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींच्या शैक्षणिक सवलती; राज्य सरकारचा मोठा निर्णय

विधान परिषद निवडणूक : परस्पर माघार घेणाऱ्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

भारतासोबतचा व्यापार आता फायद्यात- ट्रम्प

'कॉकरोच'चे आज आंदोलन, अभिजीत दीपके येणार भारतात

ममतांच्या बैठकीला फक्त ८ आमदार हजर; खासदारांनीही फिरवली पाठ