Satara : जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले; शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली! 
महाराष्ट्र

Satara : जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले; शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली!

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

रामभाऊ जगताप

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भाजपमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात भाजपचे सर्वाधिक संचालक निवडून आल्याने अध्यक्षपद भाजपकडेच येईल, अशी अपेक्षा होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही भाजपचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड झाल्याने भाजपच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.

निवडणुकीतील पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाच्या निवडीची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. आपण या प्रक्रियेतील चर्चेत सहभागी नव्हतो, असे स्पष्ट केले. महायुती म्हणून निवडणूक लढवली असून, नूतन अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना शुभेच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, ‘आगे आगे देखो होता है क्या’, असे सूचक विधानही त्यांनी केले.

शिवेंद्रसिंहराजेंचा गोरेंना टोला

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला. जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी पुढे येता आणि अपयश आल्यावर दुसऱ्याकडे बोट दाखवता, ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सुनावले. महायुती म्हणून निवडणूक लढवली असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पदाधिकारी निवडीत महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण माघार घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्ष भाजपचाच व्हायला हवा होता !

दरम्यान, भाजपचे माजी खासदार तथा जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही अध्यक्षपद भाजपकडे असायला हवे होते, अशी भूमिका मांडली. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तीच अपेक्षा होती; मात्र तसे घडले नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीवरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले असून, भाजपमधील नेत्यांमध्येच पराभवाच्या जबाबदारीवरून सुरू झालेली शाब्दिक चकमक आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा

प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती; शिंदेंची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा; रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती

तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार? राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा; ५० पेक्षा कमी सभासद संख्येच्या संस्थांची निवडणूक AGM मध्ये; महाराष्ट्र सहकारी संस्था नियमांत सुधारणा