मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार हा आयोगाचे विद्यमान सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तत्कालिन अध्यक्ष विवेक भीमनवार हे रजेवर गेल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
सतीश वाघोले हे नुकतेच सप्टेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले होते. विशेष म्हणजे, ७ सप्टेंबर रोजी स्वतः विवेक भीमनवार यांनीच वाघोले यांना सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली होती. मात्र, केवळ एका महिन्याच्या कालावधीत निर्माण झालेल्या या अनपेक्षित परिस्थितीमुळे सतीश वाघोले यांच्यावर आता अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी आली आहे.