पुणे : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज वीज प्रकल्पांसाठी दुर्मिळ झाडांची कत्तल सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सह्याद्रीच्या संरक्षणासाठी आता येत्या ३ डिसेंबरला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली.
या मोर्चाच्या माध्यमातून भीमाशंकर आणि तारळी प्रकल्पांमधील कथित पर्यावरणीय हानीचा मुद्दा प्रशासनासमोर मांडला जाणार आहे. संबंधित प्रकल्पांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि सह्याद्रीच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी आंदोलकांची मागणी असणार आहे.