नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले.
एकत्र सुनावणी
या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले असून, या दोन्ही याचिकांवर आता बुधवारी एकत्र सुनावणी होणार आहे.
अंतिम युक्तिवाद
याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करत, प्रकरणाचा निकाल लवकरच दिला जाईल, असे संकेत दिले होते. त्यावेळी न्यायालयाने २१ व २२ जानेवारीला सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेऊ, याव्यतिरिक्त दुसरे प्रकरण सूचिबद्ध केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने कोर्ट मास्टरना दोन्ही दिवशी इतर प्रकरण कार्यतालिकेत सूचिबद्ध न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
‘राष्ट्रवादी’ आणि 'घड्याळ' सुनावणी
दुसरीकडे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली असून, अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अंतिम सुनावणीला वेग मिळणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.