राजन चव्हाण / सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी वनक्षेत्रात हत्तींसाठी स्वतंत्र अधिवास निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे स्पष्ट आदेश राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तिलारी धरण परिसरात हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती आणि बागायतींचे होणारे नुकसान रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हत्तींच्या अधिवासासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचनाही नाईक यांनी दिल्या. मंत्रालयातील नाईक यांच्या दालनात नुकतीच यासंदर्भात बैठक झाली.
तिलारी धरण परिसरात कर्नाटक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड परिसरातून गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींचे कळप येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर हत्तींचे कळप तिलारी परिसरात दाखल होतात आणि त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये ते ठाण
मांडतात. गेल्या काही वर्षांत हत्तींच्या कळपांनी परिसरातील शेती आणि बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. हत्तींचा उपद्रव कायमस्वरूपी थांबवून शेती-बागायतीचे नुकसान रोखावे, अशी ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.
तिलारी धरण परिसरातील राखीव वनक्षेत्रात हत्तींसाठी आवश्यक खाद्य उपलब्ध करून देण्यात यावे. संपूर्ण क्षेत्राला संरक्षक कुंपण उभारून हत्तींचा सुरक्षित अधिवास निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेश वनमंत्र्यांनी दिले. या कामासाठी सुमारे १२ कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
आरोंदा कांदळवन प्रकल्पालाही गती
वेंगुर्ला तालुक्यातील आरोंदा परिसरातील ‘कांदळवन बोर्डवॉक इंटरप्रिटेशन सेंटर’ अर्थात निसर्ग पर्यटन व पर्यावरण शिक्षण केंद्राला कांदळवन प्रतिष्ठानमार्फत मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर निधीला मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.‘कांदळवन पार्क’सह संबंधित सर्व कामांना गती देऊन स्थानिकांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीला माजी मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे, दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, राजन मौर्ये तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजरा परिसरात ‘हत्तीग्राम’
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा-घाटकरवाडी परिसरात ‘हत्तीग्राम’ उभारण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रकल्पासाठी सुमारे ९० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना वनमंत्री नाईक यांनी वनविभागाला दिल्या. हत्ती तसेच अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्याबाबत दिली जाणारी नुकसानभरपाई यावरही बैठकीत चर्चा झाली. नुकसानभरपाईबाबत व्यवहार्य दृष्टिकोन स्वीकारून ती वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना नाईक यांनी दिल्या.
बांबूच्या नुकसानीलाही भरपाई मिळणार?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात आली आहे. हत्तींचे कळप या बांबूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. मात्र, वनविभागाकडून बांबूला गवत म्हणून वर्गीकृत केले जात असल्याने त्यासाठी नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे बांबूचा वनस्पती म्हणून समावेश करून त्यानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. ही मागणी तत्त्वतः मान्य करण्यात आली असून, त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
‘ट्रॅन्क्विलायझर’ उपलब्ध करून देणार
हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच हत्तींच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना ‘ट्रॅन्क्विलायझर’ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही वनमंत्र्यांनी दिल्या. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या मागील भागातील जागा वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. या परिसराला आवश्यक ते कुंपण घालणे, वन्यप्राण्यांना सुरक्षित परिसरात स्थलांतरित करणे तसेच त्यांच्या सुरक्षित अधिवासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. ही कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या.