आंबा-काजू बागायतदारांना ‘एआय’ तंत्रज्ञानाचे बळ; जिल्ह्यातील ३३५ बागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

आंबा-काजू बागायतदारांना ‘एआय’ तंत्रज्ञानाचे बळ; जिल्ह्यातील ३३५ बागांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बागायतदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन बागायतदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३३५ आंबा-काजू बागांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ अधिकाधिक बागायतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

आंबा-काजू बागायतदारांच्या उत्पादनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या एआय आधारित उपक्रमाचा आढावा घेताना ते बोलत होते. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यावर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच बागायतदारांना ड्रोनद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पारंपरिक आंबा-काजू बागायतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. त्यामुळे एआय प्रणालीचा वापर केवळ प्रायोगिक स्वरूपात न राहता तो बागायतदारांच्या दैनंदिन शेतीकामात प्रत्यक्ष उपयोगी ठरला पाहिजे, अशी भूमिका राणे यांनी मांडली. सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ देणे, उत्पादनक्षमता वाढविणे, बागायतदारांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विश्वजीत बाबले, डॉ. विवेक भोईटे, डॉ. भूषण गोसावी, ओंकार ढोबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक-नवरे, सतीश सावंत आदी उपस्थित होते.

मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामान, बागेची सद्यस्थिती, रोग-किडींचा प्रादुर्भाव आणि आवश्यक कृषी उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणे गरजेचे आहे. यासाठी बागायतदारांना ॲपचा वापर करण्याचे योग्य प्रशिक्षण देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ड्रोन फवारणीमुळे वेळ आणि मजुरीची बचत होण्याबरोबरच फवारणीचा खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदारांना ही सुविधा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासह निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
नितेश राणे, पालकमंत्री

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; जळगावात नीचांकी ८ अंश तापमानाची नोंद

Maharashtra HSC Exam 2027 : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली

Satara : जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले; शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली!

सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण : पार्थ पवार यांना दिलासा