कराड : महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड, तालुका माण येथील श्री. सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही मंगल विवाह सोहळा कार्तिक शुद्ध द्वादशीस (तुळशी बारस) बुधवारी मध्यरात्री बारा वाजता पारंपरिक पद्ध संपन्न होणार आहे. या शाही मंगल विवाह सोहळ्याच्या तयारीची लगीन घाई मंदिराचे पुजारी व मानकरी यांच्यात सुरू झाली आहे.
श्रींच्या विवाह सोहळ्यास प्रत्येकवर्षी सुमारे पन्नास हजारांहून अधिक संख्येने भाविकांची उपस्थिती असते. यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराची दर्शन बारी यासह मंदीर परिसर व मंदीरातही स्वच्छता याबरोबरच रंगरंगोटीची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. या विवाह सोहळ्यानिमित्त मंदीर शिखर व आवारातही आकर्षक रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रींची घटस्थापना, हळदी लावणे व विवाह प्रित्यर्थ भाऊबिजेस फटाक्यांच्या आतषबाजीत दिलाळी मैदान (श्री म्हातारबाबा मंदीरास सालकरी व मानकरी यांच्या भेटीचा कार्यक्रम) हजारोंच्या संख्येतील भाविक व महिलांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पाडवा ते मार्गशिर्ष प्रतिपदा देव दीपावली या दरम्यान तब्बल एक महिन्याच्या कालावधीचा श्रींचा शाही विवाह सोहळा पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. श्रींच्या अभ्यंगस्नानानंतर मंदीराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशद्वारा नजिकच्या श्री. म्हातारबाबा मुर्तीच्या समोर मंदीराचे सालकरी महेश बुरंगे-गुरव व सालकरीण शुभांगी गुरव यांच्या हस्ते विविध धान्याचा समावेश असलेल्या बिजरोपण करण्यात आले.
शिल्पास प्रथमच वज्रलेप
अकराव्या शतकातील या पुरातन मंदिरातील सुमारे पाच फूट उंचीच्या काळ्या पाषाण दगडी हत्तीच्या शिल्पास प्रथमच वज्रलेप करून पौराणत्व जपून आकर्षक असे करण्यात आले आहे. या बरोबरच मंदिरातील शिवलिंगासही कुशल कारागिरांकडून मंदिर ट्रस्टने वज्रलेप करून त्यामध्ये पुन्हा धार्मिक विधी करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.