महाराष्ट्र

ST च्या चालक-वाहकांना आता अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

२५ जानेवारी २०२६ रोजी सरनाईक यांनी परळ बसस्थानकाला भेट दिली असता तेथे काही धक्कादायक प्रकार आढळून आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.

हा चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जनजागृतीसाठी प्रशिक्षण सत्र

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. आगारांमध्ये ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे, ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाइट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर आहे.

माणुसकीच्या निष्पापांसंगे युद्ध आमुचे सुरू...

आजचे राशिभविष्य, ७ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच