महाराष्ट्र

दिशा सॅलियनप्रकरणी नितेश राणेंना समन्स; चौकशीसाठी येताना पुरावा सादर करण्याचे आदेश

चार वर्षांपूर्वी दिशा सतीश सॅलियन या तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहताना पुरावा सादर करण्याचे समन्स विशेष तपास पथकाकडून बजाविण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : चार वर्षांपूर्वी दिशा सतीश सॅलियन या तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहताना पुरावा सादर करण्याचे समन्स विशेष तपास पथकाकडून बजाविण्यात आले आहे.

दिशा सॅलियन प्रकरणात नितेश राणे यांनी यापूर्वी अनेक गंभीर आरोप केल्याने या आरोपाबाबत त्यांना आता पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे नितेश राणे चौकशीसाठी हजर राहणार की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

८ जून २०२० रोजी दिशाने मालाड येथील मालवणी, जनकल्याण नगरात ‘गॅलक्सी’ नावाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. याच इमारतीमध्ये रोहन रॉय हा राहत असून दिशा ही त्याची प्रेयसी होती. आत्महत्येच्या दिवशी दिशासह इतर चार मित्र रोहनच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्या घरी पार्टी झाली होती. रात्री उशिरा दिशा ही बाराव्या मजल्यावरून पडली होती, ही माहिती समजताच तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे उघडकीस आले होते.

याप्रकरणी दिशाच्या आई-वडिलांसह तिथे उपस्थित सर्व मित्रांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. दिशा ही मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.

मात्र, सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांनंतर मालवणी पोलिसांनी या गुन्ह्यात कोणालाही काही माहिती द्यायची असेल किंवा पुरावे सादर करायचे असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते. मात्र कोणीही पुढे आले नव्हते.

नितेश राणेंनी केले होते आरोप

याप्रकरणी नितेश राणे यांनी सुरुवातीपासून दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याकडे भक्कम पुरावे असल्याचा दावा करून ते पुरावे सीबीआयला देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी अद्याप कुठलेही पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांनी ते पोलिसांना सादर करावे, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक