मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रफुल पटेल यांची जागा रिक्त झाल्यामुळं त्यांच्याजागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा होती. सुनेत्रा पवार यांच्यासोबतच पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी यांची नावंदेखील चर्चेत होती. मात्र आज सकाळी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारी त्यांनी आपला उमेदवारीदेखील भरला.
छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा...
दरम्यान पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात. असं भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले की, "मीसुद्धा राज्यसभा लढण्यासाठी इच्छुक होतो. पण सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. पक्षात चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला. माझ्या तोंडावर दिसतंय का नाराज आहे? मी नाराज नाही, पक्षात सर्वांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात."
प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही...
"प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. माझ्यासोबत आनंद परांजपे इच्छुक होते. १३ लोक इच्छुक होते म्हणताय मग सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य आहे का? एकालाच उभा करायचंय, तर सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झालं असंही भुजबळांनी सांगितलं.
सुनेत्रा पवारांसाठी एकवटले राष्ट्रवादीचे आमदार-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील आमदारांनी अजित पवार यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली होती. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी शरद पवार आणि अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीच्या गावकऱ्यांनी केली होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पत राखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर नियुक्ती झाली पाहिजे, अशी मागणी काटेवाडी ग्रामस्थांनी केली होती. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे.