"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट ({Photo-X/@SunetraA_Pawar)
महाराष्ट्र

"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील...

किशोरी घायवट-उबाळे

बारामती : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांची आज (दि. २२) जयंती आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देश हळहळला होता. जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक वर्षे आनंदात आणि उत्साहात साजरा होणारा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटून जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या आठवणी, त्यांचे विचार, लोकसेवेची तळमळ आणि त्यांनी दिलेले प्रेम आयुष्यभर सोबत राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी

दादा...

एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला... घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा.. पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात. तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ... आज हे सगळं अचानक हरवून गेलंय, सगळं सगळं पोरकं झालंय यावर विश्वासच बसत नाही. काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत. दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी , तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील... माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम...!

स्मारकस्थळी कुटुंबीयांकडून अभिवादन

जयंतीनिमित्त बारामतीतील स्मारकस्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबातील सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या लोकसेवा, विकासकामे आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.

समर्थकांकडूनही श्रद्धांजली

सुनेत्रा पवार यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. अनेक समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai : उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉकचे जाळे विस्तारणार; महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार

Mumbai : हायकोर्टाने सरकार, पालिकेला ठणकावले; सार्वजनिक प्रकल्प अर्ध्यावर रद्द केल्यास अधिकाऱ्यांनी स्वत: भरपाई द्यावी

Mumbai : ई-कचरा व्यवस्थापनासाठी व्यापक धोरण! वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट; पालिका सभागृहाची मंजुरी

Mumbai : बोरिवलीत बेस्ट बस दुभाजकावर धडकली; मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही