महाराष्ट्र

पालघरमध्ये भागेरिया केमिकल कारखान्यात विषारी वायू गळती; प्रशासन सतर्क, नागरिकांना खबरदारीचा इशारा

कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा वायू वातावरणात पसरल्यामुळे काही भागात पांढऱ्या धुरासारखा किंवा धुक्यासारखा दिसू शकतो.

किशोरी घायवट-उबाळे

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात आज (दि.२) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास भागेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड (Bhageria Industries Limited) या कंपनीतून सल्फर ट्रायऑक्साइड (SO₃) वायूगळती झाल्याचा संशय व्यक्त होताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बोईसर एमआयडीसी अग्निशमन दल, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, कारखान्यातील साठवण टाकीतून ओलियम (Oleum) वायूची गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा वायू वातावरणात पसरल्यामुळे काही भागात पांढऱ्या धुरासारखा किंवा धुक्यासारखा दिसू शकतो.

प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी घाबरू नये

जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. "गळतीचा स्त्रोत नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल, प्रशासन आणि पोलीस पथके कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," असे त्यांनी स्पष्ट केले.

खबरदारी म्हणून स्थलांतर

माहितीनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील काही रहिवासी भाग आणि शाळा तात्पुरते रिकामे करण्यात आले आहेत. तसेच जवळील औद्योगिक कंपन्यांना कामकाज बंद ठेवून कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांसाठी सूचना जाहीर

  • घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात.

  • पंखे, एसी आणि इतर वायुविजन यंत्रणा तात्पुरत्या बंद कराव्यात.

  • अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे.

  • बाहेर पडताना नाक व तोंड ओल्या कापडाने झाकावे.

  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.

  • शक्य असल्यास वाऱ्याच्या उलट दिशेने स्थलांतर करावे.

हवेची गुणवत्ता तपासणी सुरू

आपत्कालीन पथके परिसरातील हवेची गुणवत्ता तपासत असून आसपासच्या भागांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाचा आढावा घेत आहेत. गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास सुरू असून प्रशासनाकडून पुढील अद्ययावत माहितीसाठी प्रतीक्षा आहे.

दरम्यान, नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट; परिसरात धुराचे प्रचंड लोट, कारखान्याचे पत्रेही उडाले, Video

Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित