Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO

अशोकधाम हॉल्टवर एकाच वेळी दोन ट्रेन आल्याने गर्दीत अचानक गोंधळ उडाला आणि काही वेळातच परिस्थिती चेंगराचेंगरीपर्यंत पोहोचली.
Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO
Bihar : श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी; VIDEO
Published on

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. अशातच बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोकधाम मंदिराबाहेर सोमवारी (दि. १७) पहाटे भाविकांची मोठी गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात ते आठ महिलांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अचानक गोंधळ, बॅरिकेडिंग कोसळलं अन् चेंगराचेंगरी

प्राथमिक माहितीनुसार, अशोकधाम रेल्वे स्थानकाकडून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. सकाळी गर्दी वाढत असतानाच मार्गावर वीजेचा खांब पडला. काही भाविकांना विजेचा धक्का (शॉक) लागल्याची माहिती पसरल्याने अचानक घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू झाली. याच गोंधळात बॅरिकेडिंग कोसळल्याने अनेक जण खाली पडले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा प्रशासनाने नंतर या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नीरज कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाविकांचा मृत्यू विजेचा शॉक लागल्यामुळे झालेला नसून चेंगराचेंगरीत चिरडल्याने झाला. घटनेच्या वेळी परिसरातील वीजपुरवठा बंद होता आणि विजेच्या तारा झाकलेल्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दोन ट्रेन एकाच वेळी आल्याने वाढला गोंधळ?

प्रशासनाच्या प्राथमिक तपासानुसार, सोमवारी सकाळी अशोकधाम हॉल्टवर दोन्ही दिशांनी एकाच वेळी दोन ट्रेन आल्या. ट्रेन पाहताच काही तरुण अचानक धावू लागले. त्यामुळे आधीच मोठी गर्दी असलेल्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याचदरम्यान एक वीजेचा खांब कोसळला. खांब पडल्याने काही जणांना विजेचा धक्का लागल्याची अफवा गर्दीत वेगाने पसरली.

अफवेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धाव घेतली. अचानक वाढलेल्या गर्दीच्या दबावामुळे बॅरिकेडिंग कोसळले. अनेक भाविक खाली पडले आणि त्यांच्यावर गर्दीतील इतर लोक पडल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वृत्त आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in