विशेष प्रतिनिधी/मुंबई, शिर्डी
२०१९ मध्ये अजित पवार यांनी केलेल्या बंडात सर्वात मोठा हात सुनील तटकरे यांचा होता. तटकरे यांनी हे घर फोडले. पण, तुमच्या घराची काय स्थिती आहे, तुमच्या सख्ख्या बहीण-भावांत काय होत आहे, हे सर्वांना माहित आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, अशा शब्दांत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिर्डीत बुधवारपासून ‘ज्योत निष्ठेची : लोकशाहीच्या संरक्षणाची’ या विषयावर दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवार गटावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवणे ही मोठी चूक होती, याचा पुनरुच्चार केला. जिथे जिथे संधी मिळाली, तिथे त्यांनी साहेबांच्या माणसांचा अपमान केला. दत्ता मेघे यांचे उत्तम उदाहरण आहे, असेही आव्हाड म्हणाले.
साहेब ते तुमच्या वयाबद्दल बोलतात. दिलीप वळसे पाटील यांच्या वयात काय आहे? ते व्हीटी ते आंबेगाव मॅरेथॉन धावणार आहेत का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला, तर तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना मैत्रीसाठी अजित पवार यांनी मला सोडून तटकरेंच्या मुलीला पालकमंत्री केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला घेऊन हे सत्य सांगितले, असा गौप्यस्फोटही आव्हाड यांनी केला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने लढा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे सांगतानाच या शिबिरातून जो संदेश मिळेल, तो घराघरांत पोहोचवून संघर्षाच्या काळात आपण हिमतीने लढू या, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
आ. रोहित पवारांच्या
गैरहजेरीचीही चर्चा
शिर्डीत राष्ट्रवादीचे दोन दिवसीय शिबिर सुरू झाले. या शिबिरात आ. रोहित पवार यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पक्ष एकसंघ असतानाही ‘मंथन-वेध भविष्याचा’ हे दोन दिवसांचे शिबिर झाले होते. त्यावेळी शिबिराच्या दुस-या दिवशी त्यावेळचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दांडी मारली होती. त्यामुळे त्याची चर्चा रंगली होती. आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार गैरहजर आहेत. त्याची चर्चा सुरू होताच त्यांनी मी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बाहेर असल्याचे म्हटले. त्यामुळे चर्चेवर पडदा पडला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आ. रोहित पवार यांच्यात मतभेद असल्याने ते गैरहजर झाल्याचे बोलले जात होते.
राम बहुजनांचे, ते मांसाहारी
यावेळी बोलताना आव्हाड यांनी राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र, आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असा प्रश्न शिबिरात बोलत असताना उपस्थित केला. या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा ते टीकेचे धनी बनले आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत, असे आव्हाड म्हणाले.