मुंबईः विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दानवेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या भूमिकेमुळे विधान परिषद निवडणुकीचे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, गुरुवारी शेवटची मुदत आहे. या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २९ मतांची गरज आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. त्यासाठी हर्षवर्धन सकपाकाळ यांनी 'मातोश्री' वर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस पाठींबा देईल अन्यथा काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे सकपाळ यांनी जाहीर केले होते.
विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उद्धव ठाकरे हेच आघाडीचे उमेदवार असतील, असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, आज ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा करून पक्षातील नेत्यांना तसेच काँग्रेसलासुद्धा धक्का दिला.विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करताना शिवसेना ठाकरे गटाने आम्हाला विश्वासातच घेतले नाही आणि चर्चा सुद्धा केली नाही.
जर उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर आम्ही सहकार्य करू अशी आमची भूमिका होती, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, मविआ म्हणूनच अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कोणाला काही वाटत असेल तर वरिष्ठांशी बोलूनच घोषणा झाली असेल. कोणाला शंका असेल तर चर्चेतून मार्ग काढता येईल. चर्चा वरिष्ठ पातळीवर होते. त्यामुळे मी बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रतीक्षादरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आज, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून बुधवारी रात्री उशीरा किंवा आज, सकाळी उमेदवारांची घोषणा केली जाईल.
’उद्धव ठाकरेंनी सभागृहात जावे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी त्यांची जागा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, याबद्दल त्यांचे त्यांचे आभार मानतो'अंबादास दानवे, ठाकरे गटाचे उमेदवार