File Photo 
महाराष्ट्र

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर करण्यात येणार

विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले

प्रतिनिधी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, हे अधिवेशन चार आठवडे चालणार आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यात आले. अधिवेशन २५ मार्चपर्यंत म्हणजे चार आठवडे चालणार असून, राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कारकीर्दीतला पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाचा कालावधी एका महिन्याने वाढवावा, अशी मागणी केली आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधान परिषद आणि विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात २७ फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी ‘वंदे मातरम्’नंतर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्राचे राज्यगीत वाजवण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहांत याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस, तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे घेण्यात आली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, विधिमंडळ सदस्य अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, आशिष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

अधिवेशन एक आठवडा वाढवा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढविण्यात यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैठकीनंतर बोलताना केली. दोन्ही सभागृहांतील सदस्यांना आपल्या भागातील प्रश्न मांडायचे आहेत, चर्चा करायची आहे. त्यामुळे सरकारने पळवाट काढू नये. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनांवेळी संबंधित मंत्री उपस्थित नव्हते, असे दिसून आले होते. त्यामुळे याची पुनरावृत्ती होऊ नये आणि मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती