शिवसेनेतील संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्रही लिहिले आहे. त्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांची नावे असल्याचे वृत्त आहे. या सर्वांपासून आम्हाला धोका असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.