जळगाव : उत्पादन विक्रीचे प्रत्यक्ष बाजारात जाऊन अनुभवात्मक शिक्षण देण्याचे काम रायसोनी मंडीतून प्राप्त व्हावे या हेतूने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये रायसोनी-मंडी २०२४ या उपक्रमाचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले आहे. यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष बाजारात जाऊन वस्तू विक्री तसेच अनुभव कथन या पद्धतीने हा तीन दिवसीय उपक्रम संपन्न होणार आहे.
उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, २००८ पासून आम्ही रायसोनी-मंडी हा उपक्रम राबवीत आहोत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधे समाविष्ट असलेल्या विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप आधीपासूनच आमच्या महाविद्यालयाचे मार्गक्रमण सुरू आहे. मुख्यतः “बिजनेस मॅनेजमेट” हा विषय वर्गात थेरी शिकवण्याबरोबरच बाहेरच्या वातावरणात जात तेथील विविध प्रात्यक्षिक ज्ञान घेणारा विषय आहे. रायसोनी मंडी या उपक्रमातून विध्यार्थी “लर्निग बाय सेलिंग” शिकतात म्हणजेच विद्यार्थ्यांना यातून नेतृत्व, टीमवर्क, टार्गेट सेट, नेटवर्किंग, अर्थशास्त्र, अकाऊंट, नियोजन, डीसीजन मेकिंग यासारखे विविध विषय शिकता येतात तसेच व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, ग्राहकांच्या गरजांची जाणीव त्यांनी समजून घ्यावी, वस्तूचे महत्त्व जाणून बाजारात उतरावे, तसेच आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, या गुणांसह व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे असून प्रत्यक्ष विक्रीचे अनुभव मिळावेत या उद्देशाने रायसोनी मंडी हा तीन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत आहे.
या संपूर्ण उपक्रमाचे समन्वय एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. डॉ. विशाल सुनील राणा, प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. श्रेया कोगटा यांनी साधले तसेच यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, प्रा. तन्मय भाले, प्रा. प्राची जगवानी, प्रा. सरोज पाटील व आदी उपस्थित होते.