लातूर : आपण एखाद्याला लग्न, वाढदिवस, गृहप्रवेश, धार्मिक कार्यक्रमाला मोठमोठ्या भेटवस्तू देतो.. पण, बीड जिल्ह्यातील सुधाकर देशमुख यांनी वेगळा मार्ग चोखाळून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला आहे.
लहानपणी गरिबीमुळे शेतात काम करताना जंगलातील रानटी फळे खाऊन जगलेल्या बीड जिल्ह्यातील माळशिरस भागातील देशमुख यांनी विविध प्रसंगांमध्ये ४० वर्षांत १८ लाख रोपे भेट दिली आहेत.
आंबेजोगाई तालुक्यातील मामलापूर गावातील रहिवासी असलेल्या देशमुखांनी विवाह सोहळे, वाढदिवस, गृहप्रवेश, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये १८ लाखांपेक्षा जास्त रोपांचे मोफत वाटप केले आहे.
फळे खाल्ल्यानंतर त्याच्या बिया फेकून न देता त्यांनी नदीकाठ, मोकळ्या जागा आणि खडकाळ भागात लावणे हा त्यांचा आणखी एक उपक्रम होय. या चळवळीला व्यापक रूप देण्यासाठी त्यांनी २००२ मध्ये ‘वृक्षमित्र अभियान’ सुरू केले.
या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या घरी एक मोफत रोपवाटिका आणि बीज बँक स्थापन केली आहे. यात वटवृक्ष, पिंपळ, चिंच, आंबा, आवळा, बेल, करंज आणि कदंब यांसारख्या अनेक देशी प्रजातींच्या बियांचा संग्रह केला आहे.
या बिया विद्यार्थी, शेतकरी, महिला बचत गट आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत दिल्या जातात. वृक्षारोपणाबरोबरच देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसमावेशक वृक्षगणनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
२००५ पासून जनजागृती मोहिमेद्वारे या कारभाराचा पाठपुरावा करत असतानाच, २०१२-१३ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाने तीव्र आंदोलन छेडले होते.
ज्या झाडांच्या खोडाचा घेर किमान ६ फूट आणि उंची ७ ते १० फूट आहे, त्यांची अधिकृत गणना करून नोंद ठेवावी, तसेच प्रत्येक गावात एकूण झाडांची संख्या दर्शवणारे फलक लावावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
..आणि वृक्षगणना होऊ लागली
या प्रदीर्घ योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना २०२३ मध्ये प्रतिष्ठित ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे. देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियाना’त वृक्षगणनेचा समावेश करण्यात आला आहे.
२०२२-२३ मध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील झाडांची गणना करून अधिकृत रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, हे या चळवळीचे मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.