मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप देताना, ‘२०२९पर्यंत आम्हाला विरोधी पक्षात यायचा स्कोप नाही. पण तुम्हाला सत्तेत यायचा स्कोप आहे,’ अशी खुली ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी दिली होती. त्यानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसह फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दालनात पोहोचल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंदी भाषा सक्तीसह विरोधी पक्षनेतेपद अशा विविध विषयांवर जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत दानवे यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करत फडणवीस यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “२०२९ पर्यंत आम्ही विरोधी पक्षात बसण्याची शक्यता कमी आहे, परंतु तुम्हाला सत्ता पक्षात यायचे असेल, तर तसा विचार करावा लागेल.” असे म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेसाठी ऑफर दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर काल दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यानंतर लगेच गुरुवारी दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.
भेट राजकीय नव्हती - आदित्य ठाकरे
दरम्यान, या भेटीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, “ही भेट आम्ही हिंदी सक्तीविरोधात राज्यातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित पुस्तक भेट देण्यासाठी घेतली आहे. बाकी ही भेट राजकीय नव्हती.” यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, सचिन अहिर, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, महेश सावंत, बाळा नर आदी उपस्थित होते.
‘हिंदी सक्ती कशाला हवी’ पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्व आमदारांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ‘हिंदी सक्ती कशाला हवी,’ हे राज्यभरातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलित पुस्तक मुख्यमंत्री तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना दिले. यावेळी हे पुस्तक डॉ. नरेंद्र जाधव यांना द्यावे, असे फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.