स्मृतिदालनाचे लोकार्पण, नव्या वादाची चिन्हे; बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण - उद्धव ठाकरे X|@ShivSenaUBT_
महाराष्ट्र

स्मृतिदालनाचे लोकार्पण, नव्या वादाची चिन्हे; बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण - उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदालनाचे काम २३ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बाळासाहेबांवर खरी निष्ठा आणि प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण होईल, या वक्तव्यामुळे उद्घाटनाच्या निमंत्रणावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Swapnil S

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिदालनाचे काम येत्या २३ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या दालनाचे लोकार्पण बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम आणि त्यांच्या विचारांची बांधिलकी असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच केले जाईल. केवळ एखाद्या पदावर किंवा खुर्चीवर बसलेली व्यक्ती लोकार्पणासाठी योग्य ठरत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे स्मृतिदालनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याच्या राज्यातील भाजप नेत्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमिवर नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमित शहा हे थापाडेबाज

अमित शहा हे थापाडेबाज गृहमंत्री आहेत. खोटे बोलण्याखेरीज त्यांनी दुसरे कोणतेही कर्तृत्व दाखवलेले नाही. अजित पवार हयात असताना त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करून त्यांची थोरवी गायली जात आहे. अमित शहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी, अशी जळजळीत टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली. शहांचे विधान म्हणजे ब्रह्मवाक्य नसून थापाड्याचे वाक्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

अमित शहा यांचा ठाकरे शैलीत समाचार

बाळासाहेब ठाकरे यांच्या चौदाव्या स्मृतिदिनानिमित्त आज बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजप नेते अमित शहा यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला. देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहांनी राजकीय टोलेबाजी करण्यापेक्षा मणिपूरमधील परिस्थितीकडे आणि अरुणाचल प्रदेशातील नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. चीनच्या विरोधात सैन्यासोबत उभ्या असलेल्या नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरावे. मात्र, देशातील गंभीर प्रश्नांवर काम करण्याऐवजी राजकीय चकाट्या पिटण्यातच त्यांना रस असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

शहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी

अजित पवार हयात असताना भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मात्र, आता त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करताना शहा त्यांची थोरवी गात आहेत. अजित पवार जिवंत असताना त्यांच्या कामाचे दोन चांगले शब्द बोलले असते, तर त्यांना समाधान मिळाले असते. काल केलेल्या कौतुकातील काही शब्द जरी त्यावेळी बोलले असते, तरी बरे झाले असते. त्यामुळे अमित शहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर जाऊन माफी मागावी, असे ठाकरे म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचे संकट गडद; आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित, राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार

आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवार अपघातप्रकरणी चाैकशीची मागणी

३ हजार ४२ धरणांमध्ये ६४ टक्केच पाणी; राज्यातील स्थिती चिंताजनक; गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट

चीनला शह देण्याचे आखाडे; बळाच्या वापराने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकतर्फी कृतींना ‘क्वाड’ परिषदेत विरोध

'एसआयआर'बाबत ९ डिसेंबरला सुनावणी