मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते. पक्षातील एका पदाधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ५ ते ८ डिसेंबर किंवा ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
या दौऱ्यात ते आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या मुलीच्या विवाह स्वागत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संजय सिंह यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री' येथे जाऊन उद्धव ठाकरे यांना स्वागत समारंभाचे निमंत्रण दिले होते.
दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.