मुंबई : राज्यात अतिवृष्टी झाली शेतपिकाचे नुकसान झाले, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र राज्य सरकारकडून कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करायला कोणी आले नाही. भ्रष्टाचारी सरकारकडे आता मतचोरीशिवाय कोणताही पर्याय नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीवर केली.
जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात अतिवृष्टी झाली. शेतपिकाचे नुकसान झाले, जमीन खरडून गेली, राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र शेतकऱ्यांना अद्याप पूर्णतः मदत मिळालेली नाही. कर्जमाफी कागदावरच आहे. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्याही परिस्थितीमध्ये करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
१०० वर्षांत मराठवाड्यावर असे कधीही संकट आले नाही. तुम्ही सर्व शेतकरी आहात ना? माझ्यासारखे शहरीबाबू नाहीत ना? मी खरं सांगतो की, मला शेतीमधील काहीच कळत नाही. आता जर कर्जमुक्ती केली नाही, तर मग कधी करणार ? जमीन खरडून गेली आहे, तरीही इकडे कोणी यायला तयार नाही. पूर्ण माती वाहून गेली. सर्व बोगस कारभार सुरू आहे. मतचोरीशिवाय सरकारला दुसरा कोणताच पर्याय नाही. वेळ आली तर धोंडे मारा, असे मी म्हणणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १० हजार टाका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. बिहार निवडणूक बघता तेथील महिलांच्या बँक खात्यात १० हजार रुपये टाकले. तसेच देशातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १० हजार रुपये टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.
मुलीच्या शिक्षण खर्चाची जबाबदारी शिवसेनेने पेलली!
अतिवृष्टी झाल्याने माझा आणि नवऱ्याच्या डोक्यात आले होते की, आत्महत्या करावी; मुलीकडे बघून आम्ही निर्णय बदलला. मी दिवाळी फक्त गुलामजामून बनवून केली आणि मुलीला खायला घातले. आता तिला मेडिकलच शिक्षण घ्यायचे आहे पण पैसे नाहीत, अशी व्यथा शेतकरी महिलेने उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली. जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्य मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मुलगी पास झाल्यावर पेढे घेऊन मातोश्रीवर यायचे. खर्च शिवसेना करेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.