महाराष्ट्र

ठाकरेंसोबत वंचितने युती तोडली; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

शिवसेनेसोबत (उबाठा) वंचित आघाडीने युती केली होती. मात्र, आता शिवसेनेने (उबाठा) महाविकास आघाडीला प्राधान्य दिल्याने आमची त्यांच्याशी असलेली युती संपुष्टात आली आहे, अशी घोषणा ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच यापुढे महाविकास आघाडीसोबत जमले तर आघाडी करू अन्यथा आपापला मार्ग स्वीकारू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. बऱ्याच जागांचे वाटप झालेले आहे. मात्र, काही मोजक्या जागांवरून कॉंग्रेस - शिवसेना ठाकरे गटात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यातच वंचित आघाडीला सोबत घेण्यावरूनही वाटाघाटी लांबणीवर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच आता महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिला असून, २६ तारखेपर्यंत जो काही आहे, तो निर्णय घ्यावा अन्यथा त्याच दिवशी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे स्पष्टपणे बजावले आहे. त्यामुळे वंचित आघाडी मविआसोबत राहणार की बाहेर पडणार, यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपासाठी सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. परंतु काही जागांवरून एकमत होत नाही. कॉंग्रेस पक्ष सांगली, दक्षिण-मध्य मुंबई, रामटेक, भिवंडी यासारख्या काही मतदारसंघांबाबत आग्रही आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचा ठाकरे गटही आपल्या भूमिकेवरून एकही पाऊल मागे हटायला तयार नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने भिवंडी जागेची मागणी केलेली असताना कॉंग्रेस ही जागाही द्यायला तयार नाही. त्यामुळे तिढा निर्माण झाला आहे.

त्यातच वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही महाविकास आघाडीत सन्मानजनक वाटा हवा आहे. परंतु, प्रमुख तीन पक्षांतील वादच संपत नाही, त्यामुळे मी माझे काय मांडू, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. हा तिढा मिटणार नसेल तर आमच्या एण्ट्रीने काय उपयोग आहे. महाविकास आघाडीत काय होतेय, हे पाहण्यासाठी २६ तारखेपर्यंत थांबणार, नाही तर आम्ही उमेदवार देऊ. मात्र, कॉंग्रेसने जिंकणाऱ्या ७ जागा कळवाव्यात, त्या जागांसाठी आम्ही पाठिंबा देऊ, असेही आंबेडकर म्हणाले.

महाविकास आघाडीने २६ मार्चपर्यंत काय आहे तो निर्णय घ्यावा अन्यथा त्याच दिवशी आपण आपली भूमिका जाहीर करू, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीत मनसेसारखा नवा भिडू सामिल झाल्याने महाविकास आघाडीतही वंचितला सामिल करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नेतेही अ‍ॅड. आंबेडकर यांच्या संपर्कात आहेत. मात्र, महाविकास आघाडीचेच जागांवर अंतिम शिक्कामोर्तब होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस